राष्ट्रीय

२३ एप्रिल जागतिक पुस्तकदिनानिमित्त… ग्रंथ ‘जगलेला’ राजा : महाराजा सयाजीराव

by संपादक

२३ एप्रिल जागतिक पुस्तकदिनानिमित्त… ग्रंथ ‘जगलेला’ राजा : महाराजा सयाजीराव – सुरक्षा घोंगडे, वारणानगर (७५०७३९९०७२)
– १६ व्या शतकातील प्रख्यात स्पॅनिश लेखक मिगेल द सर्व्हंट यांच्या गौरवार्थ त्यांच्या मृत्युदिनी म्हणजेच २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची कल्पना व्हिसेंट क्लॅवेल यांनी मांडली. मिगेल द सर्व्हंट यांच्याबरोबरच ब्रिटीश लेखक विल्यम शेक्सपिअर, पेरिश इतिहासकार इंका गार्सिलासो द ला वेगा इ. विविध प्रख्यात लेखकांच्या जयंती-पुण्यतिथीचे औचित्य साधून युनेस्कोने १९९५ पासून २३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. राजेशाही हा सरंजामशाही समाजव्यवस्थेतील एक निष्क्रिय, भ्रष्ट आणि आत्मकेंद्री नेतृत्वाचा मानदंड म्हणून प्रस्थापित झालेला दंडक मानला जातो. राजा स्वतःला आपल्या राज्याबरोबर आपल्या राज्यातील प्रजेचाही मालक असल्याची धारणा घेवूनच राज्य करताना आपल्या इतिहासाने वारंवार पाहिले आहे. अशा वेळी राजा आणि ज्ञान या तर दोन ध्रुवावरील गोष्टी ठरतात. – भारतीय समाजव्यवस्था विचारात घेता ज्ञानाची मक्तेदारी फक्त ब्राह्मण जातीकडे असल्यामुळे ज्ञानाच्या किल्ल्या आपल्या जानव्याला बांधून फिरणारा आणि स्वतःला राजाचा स्वामी म्हणवून घेणारा हा समुदाय ज्ञानव्यवस्थेवर आपले संपूर्ण नियंत्रण ठेवून राजाचा ‘मेंदू’ म्हणून काम करत होता. या व्यवस्थेला सुरुंग लावणारा एक ‘अपवादात्मक’ महान राजा म्हणजे सयाजीराव. कारण हा राजा आपल्या ६४ वर्षाच्या कारकिर्दीत अक्षरशः ग्रंथ ‘जगला’ होता. ग्रंथप्रेमी, ग्रंथसखा, ज्ञानमहर्षी, विद्वान, तत्वज्ञ अशा कोणत्याही उपाधीत या राजाला आपण बंदिस्त करू शकत नाही. स्वतःला विद्वान, विचारवंत, संशोधक म्हणवून घेणारे शेकडो ‘तथाकथित’ महामानव या भारतात जन्माला आले. परंतु २४ तास ज्ञानसाधनेचा ध्यास घेतलेला हा राजा जगावेगळा होता. कारण या राजाने जेवढे विद्वान सांभाळले तेवढे विद्वान हाताशी असणारा एकही राजा अथवा प्रशासक आधुनिक भारताच्या इतिहासात सापडत नाही. सर्वोच्च सत्ता आणि जगातला सातव्या क्रमांकाचा श्रीमंत म्हणून, श्रीमंती पायाशी लोळत असताना सतत ज्ञानसाधनेचा ध्यास जगणे ही केवळ असामान्य बाब आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय उभा करणारा, २०,००० ग्रंथांचे स्वतःचे ग्रंथालय असणारा आणि स्मशानातसुद्धा ग्रंथालय उभा करणारा दुसरा राजा किंवा प्रशासक सापडत नाही. म्हणूनच आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने या राजाचे स्मरण ज्ञानाचा महामार्ग खुला करणारे ठरेल. – सयाजीरावांनी आपल्या कारकिर्दीत १८०० अधिक पुस्तके प्रकाशित केली. महाराजांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये इतिहास, धर्म, जात, तत्वज्ञान, नीतिशास्त्र, चरित्र, शेती, कुटुंब, खेळ, व्यायाम, पाककला, लोकसाहित्य, भाषाशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, संशोधन, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, प्रवासलेखन, कोश वाड:मय, सहकार इ. विषयांचा समावेश आहे. सयाजीरावांनी श्री सयाजी साहित्यमाला, श्री सयाजी बालज्ञानमाला, श्रीसयाजीज्ञानमंजुषा, श्रीसयाजीलघुमंजुषा, क्रीडा ग्रंथमाला यासारख्या मराठी, गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ८-१० ग्रंथमाला सुरू केल्या. श्रीसयाजीसाहित्यमालेत ३७६ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. – राजवाड्यात होणाऱ्या धार्मिक विधींचे अर्थ जनतेला समजावेत या उद्देशाने २३ नोव्हेंबर १८८६ ला सयाजीरावांनी सर्व धार्मिक कृत्ये शास्त्रार्थासह तपशीलवार लिहून काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार रा.रा. शंकर मोरो रानडे, कृष्णदेव महादेव समर्थ आणि भाऊ मास्तर या तिघांनी धर्मविधींचा तपशीलवार शास्त्रार्थ विशद करणारा ‘ऐनेराजमेहेल’ नावाचा ग्रंथ तयार केला. १८८७ मध्ये महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या सत्यशोधक विधिंसंबंधी मंगल अष्टकांसह सर्व पूजा विधींची छोटी पुस्तिका प्रकाशित केली होती. फुलेंच्या या उपक्रमाचा विकास करत सयाजीरावांनी १८८७ मध्ये ‘नितीविवाह चंद्रिका’, १९०३ मध्ये ‘वधूपरीक्षा’, १९०४ मध्ये ‘लग्नविधी व सोहळे’, १९१३ मध्ये ‘विवाह विधीसार’, १९१६ मध्ये ‘उपनयन विधीसार’, ‘श्राद्ध-विधीसार’, ‘अंत्येष्ठिविधिसार’, ‘दत्तकचंद्रिका’, ‘दानचंद्रिका’ इ. ग्रंथ प्रकाशित केले. सयाजीरावांनी १९०३ मध्ये भिकाचार्य ऐनापुरे यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी लिहिलेला ‘प्रायश्चित्तमयूख’ हा संस्कृत ग्रंथ व त्याचे मराठी भाषांतर १९१४ मध्ये सयाजीरावांनी प्रकाशित केले. १८८८ मधील पहिल्या परदेशप्रवासानंतरच्या प्रायश्चित्तानंतर प्रायश्चित्ताबाबत धर्मशास्त्र काय म्हणते हे लोकांना कळावे आणि त्यातून लोकांची धर्माबाबत साक्षरता वाढावी म्हणून प्रकाशित केलेला हा ग्रंथ म्हणजे महाराजांच्या धर्मसाक्षरतेचा उत्तम नमूना आहे. धर्मानंद कोसंबींना १९०८ ते १९११ अशी तीन वर्षे बौद्ध धर्माचा महाराष्ट्रात प्रसार आणि ग्रंथलेखन करण्यासाठी महाराजांनी महिन्याला ५० रुपये शिष्यवृत्ती दिली होती. – ​१८८७ च्या पहिल्या युरोप दौर्‍यात सयाजीरावांनी प्राचीन ग्रंथांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनंतकृष्ण शास्त्री यांच्याकडे संपूर्ण भारतभर फिरून प्राचीन हस्तलिखिते जमा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सात वर्षाच्या भ्रमंतीतून शास्त्रींनी १०,००० हस्तलिखिते जमा केली. १९३३ पर्यंत बडोदा प्राच्यविद्या संस्थेकडे १३,९८४ हस्तलिखितांचा संग्रह उपलब्ध झाला. हा संग्रह भारतातील सर्वोत्तम संग्रहांपैकी एक मानला जातो. १९२३ मध्ये हस्तलिखितांच्या फोटोप्रती तयार करण्यासाठी बडोदा संस्थानतर्फे या संस्थेला अमेरिकन बनावटीचा छायांकनाचा कॅमेरा (झेरॉक्स मशीन) देण्यात आला. भारतात १९४० पर्यंत ग्रंथालयांना हे तंत्रज्ञान परिचितही नव्हते. हे मशिन दिवसाला १०० ताडपत्रावरील हस्तलिखितांच्या फोटोप्रती करून देत असे. अगदी १९४५ पर्यंत हे मशिन उत्तम सेवा देत असे. बाहेरील अभ्यासकांना हव्या त्या हस्तलिखितांच्या फोटोप्रती देण्याची व्यवस्था होती. प्राच्यविद्या संस्थेच्या ग्रंथालयाची सेवा विनामूल्य उपलब्ध होती. – १९१५ मध्ये बडोदा प्राच्यविद्या संस्थेतर्फे ‘गायकवाड ओरिएन्टल सिरिज’ ही संशोधन प्रकाशनमाला सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले. १९१६ मध्ये या मालेतील राजशेखरकृत ‘काव्यमीमांसा’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. १९३८ मध्ये या सिरीजमध्ये प्रकाशित झालेला ‘The Foereign Vocabulary of the Qua’ran’ हा ग्रंथ सयाजीरावांचा इस्लाम धर्मविषयक सकारात्मक दृष्टीकोन स्पष्ट करतो. सयाजीरावांच्या मृत्यूनंतर आजअखेर ही माला सुरू असून प्रकाशित ग्रंथांची संख्या अंदाजे ३०० हून अधिक भरते. यात संस्कृत, पाली, अर्धमागधी, अरेबिक आणि पोर्तुगीज भाषेतील ग्रंथांचा समावेश आहे. हिंदू, बौद्ध, जैन या प्रमुख भारतीय धर्मांच्या दुर्मिळ आणि मौलिक हस्तलिखितांचे चिकित्सक संपादन आणि प्रकाशनाचे ऐतिहासिक काम या संस्थेच्या माध्यमातून सयाजीरावांनी केले. – ​भारतातील अग्रगण्य आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या मंदिराच्या स्थापनेसाठी १,००० रुपयांची आर्थिक मदत महाराजांनी केली होती. १९१६ ते १९४० अशी २४ वर्षे सयाजीरावांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेला ५०० रुपये वर्षासनाप्रमाणे एकूण १२००० रु. मदत केली. तर १९२२ मध्ये महाभारतावरील संशोधनासाठी ५,५०० रुपये दिले गेले. सयाजीरावांनी या संस्थेला केलेली एकूण आर्थिक मदत १८,५०० रु. इतकी होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ४ कोटी ५८ लाख रु.हून अधिक भरते. परंतु या संस्थेच्या उभारणीत आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या मुलभूत योगदान देणार्‍या सयाजीरावांचा संस्थेचे आश्रयदाते म्हणून या संस्थेत फोटोसुद्धा आढळत नाही ही दुर्दैवी बाब आहे. सयाजीरावांनी १९१८ मध्ये सुरू केलेल्या ‘द गायकवाड स्टडीज इन रिलीजिन अँड फिलॉसॉफी’ या महत्वपूर्ण ग्रंथमालेत एकूण १७ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले. विशेष म्हणजे हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू या प्रमुख धर्मांबरोबरच तुलनात्मक धर्म अभ्यास आणि नीतिशास्त्र या विषयांवरील ग्रंथांचा त्यात समावेश होता. जगाच्या इतिहासातील अशा प्रकारची ही आजअखेरची एकमेव ग्रंथमाला आहे. या मालेत पहिल्या वर्षी कोल्हापूरच्या करवीरपीठाचे शंकराचार्य कुर्तकोटी यांचा पीएच. डी. प्रबंध असणारा ‘द हार्ट ऑफ भगवद्गीता’ हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. कुर्तकोटींनी हा प्रबंध अमेरिकेतील ओरिएंटल युनिव्हर्सिटीमध्ये पीएच.डी. पदवीसाठी सादर केला होता. टिळक भक्त असणार्‍या कुर्तकोटींनी टिळकांचे ‘गीतारहस्य’ १९१५ ला प्रकाशित झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन केले होते. हा भगवद्गीतेवरील जगातील पहिला पीएच.डी. प्रबंध आहे. त्याचबरोबर ‘द कंपॅरेटीव्ह स्टडी ऑफ रिलीजन’ (१९२२), ‘द डॉक्टरीन ऑफ कर्मा’, ‘अ बुद्धिस्ट बिब्लिओग्राफी’ यासारखे महत्वाचे ग्रंथ या मालेतून प्रकाशित करण्यात आले. – सयाजीरावांनी धर्म, संस्कृती, तत्वज्ञान, नीतिशास्त्र या विषयावरील प्रकाशित केलेल्या एकूण ७२ ग्रंथांमध्ये ‘राजधर्म’ (१८९०), ‘नीतिवाक्यांमृत’ (१८९१), ‘सद्वाक्यरत्नमाला’ (१८९३), ‘परमार्थ प्रवेश’ (१८९८), ‘आचारमयूख’ (१९०५), ‘धर्म शास्त्रांची मूलतत्वेॱ’ (१९०५), ‘संस्कृत वाड्मयाचा इतिहास’ (१९१५), ‘तत्वज्ञानांतील कूटप्रश्न’ (१९२६), ‘चीन देशातील सुधारणा’ (१९२८), ‘जर्मनसाम्राज्याची पुन:स्थापना’ (१९२८), ‘पाश्चात्य तत्वज्ञान’ (१९३१), ‘बौध्दधर्म अर्थात धर्मचिकित्सा’ (१९३२), ‘सुलभ नीतिशास्त्र’ (१९३३), ‘नीतिशास्त्रप्रबोधन’ (१९३३), ‘जगातील विद्यमान धर्म’ (१९३६), ‘प्राच्य आणि पाश्चात्य नीतिध्येये’ (१९३७), ‘धर्म, उद्रम आणि विकास’ (१९३७) या ग्रंथांचा समावेश होता. या विषयावरील मराठी ग्रंथांबरोबरच ६४ गुजराती ग्रंथही महाराजांनी प्रकाशित केले होते.​ ​ – महाराजांनी जातसाक्षरतेसाठी जे विविध प्रयत्न केले त्यामध्ये जातीबद्दलची वस्तुनिष्ठ माहिती हिंदू धर्मग्रंथातून भाषांतरित करून प्रकाशित करणे, जातीवरच्या वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्याबरोबरच जातीबद्दलची माहिती एकत्रित करून प्रकाशित करणे याचा समावेश होता. १९०७ मध्ये सयाजीरावांनी विठ्ठल रामजी शिंदेंचे ‘अस्पृश्योद्धार’ या विषयावर बडोद्याच्या न्यायमंदिराच्या दिवाणखान्यात व्याख्यान आयोजित केले होते. नंतर हेच व्याख्यान ‘बहिष्कृत भारत’ या स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले. सयाजीरावांनी या पुस्तकाच्या एक हजार प्रती विकत घेऊन बडोदा संस्थानात वाटल्या. १९१० मध्ये महाराजांच्या प्रेरणेने श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ‘स्पर्शास्पर्श अथवा चारही वर्णांचा परस्पर व्यवहार’ हा ग्रंथ लिहिला. सातवळेकर यांना महाराजांनी या ग्रंथासाठी ५०० रुपये बक्षीस दिले. १९२८ मध्ये बडोदा संस्थानकडून ‘A Glossary of Castes, Tribes and Races In The Baroda State’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. ​१८९७ मध्ये कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी सयाजीरावांच्या इच्छेनुसार ‘सेनेका व एपिक्टेटस यांची बोधवचनें’ हा ग्रंथ लिहिला. यानंतर महाराजांनी मॅक्स मुल्लरद्वारा भाषांतरीत ‘सेक्रेड बुक्स ऑफ दी ईस्ट’ या मालेत प्रकाशित झालेल्या बारा उपनिषदांपैकी सात उपनिषदांचे मराठी अनुवाद करण्याचे काम केळूसकरांवर सोपवले. केळूसकरांनी मॅक्स मुल्लरऐवजी मूळ संस्कृत ग्रंथांधारे हे भाषांतर केले. संस्कृत ग्रंथांवरून थेट मराठीत असे भाषांतर करणारे केळूसकर हे पहिले ब्राह्मणेत्तर ठरतात. बारा पैकी उरलेल्या सहा उपनिषदांचे भाषांतर शंकर मोरो रानडे यांनी केले. पुढे १९०६ मध्ये सयाजीरावांनी केळूसकरांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या चरित्र ग्रंथास आर्थिक सहाय्य करत ग्रंथाच्या २०० प्रती विकत घेतल्या. – सयाजीरावांनी रियासतकार सरदेसाईंना मॅकियाव्हेलीचा ‘प्रिन्स’ व सीलीच्या ‘एक्स्पॅन्शन ऑफ् इंग्लंड’ या ग्रंथांचे भाषांतर करण्याचे काम दिले. त्यानुसार सरदेसाईंनी या ग्रंथांचे अनुक्रमे ‘राजधर्म’ व ‘इंग्लंड देशाचा विस्तार’ असे भाषांतर केले. हे दोन्ही भाषांतरित ग्रंथ सयाजीरावांच्या आश्रयाने प्रकाशित झाले. सरदेसाईंच्या रियासतीतील पहिला खंड ‘मुस्लिम रियासत’ या नावाने १८९८ मध्ये बडोद्यातून प्रकाशित झाला होता. पुढे मराठी रियासत, ब्रिटिश रियासत यांच्या आवृत्या १९३५ पर्यंत निघाल्या. सरदेसाईंनी केलेल्या परमानंदांच्या अनुपुराणाचे संपादन ‘गायकवाड ओरिएंटल सिरिज’ मध्ये प्रकाशित झाले. वासुदेव लिंगोजी बिर्जे हे सत्यशोधक सयाजीरावांच्या पॅलेस लायब्ररीचे ग्रंथपाल होते. त्यांचा ‘क्षत्रीय व त्यांचे अस्तित्व’ हा ग्रंथ १९१२ मध्ये सयाजीरावांच्या आश्रयानेच प्रकाशित झाला होता. १९२० मध्ये जनरल नानासाहेब शिंदे यांनी प्राचीन काळापासूनच्या भारतातील मोठ्या लढायांच्या रणनीतीची माहिती देणारा ‘हिंदुस्तानचा लष्करी इतिहास आणि दोस्त राष्ट्रांच्या फौजा’ हा ग्रंथ लिहिला. हा मराठीतील पहिला व आजवरचा अशा प्रकारचा बहुधा एकमेव ग्रंथ आहे. मुलांच्या योग्य विकासाच्या दृष्टीने प्रजेला मार्गदर्शन करण्यासाठी १९४३ मध्ये सयाजी साहित्यमालेत यशवंत रामकृष्ण दातेलिखित ‘पिता-पुत्र-संबंध’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ​- स्त्रियांच्या संदर्भातील अनेक महत्वाचे आणि मराठीतील पहिले ग्रंथ सयाजीरावांनी प्रकाशित केले. भानुसुखराम निर्गुणराम मेहता यांनी मीराबाईंच्या जीवनचरित्राचा परिचय करून देणारे ‘मीराबाई’ नावाचे गुजराथी भाषेतील पुस्तक लिहिले. १९१३ मध्ये दाजी नागेश आपटे यांनी या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले. विनायक सदाशिव वाकसकर यांनी १९२५ मध्ये आपल्या ‘अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे’ या पुस्तकामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र लिहिले. स्त्रियांच्या जीवनातील प्रश्नांवर भाष्य करणारा कमलाबाई टिळक यांचा ‘स्त्री-जीवनविषयक काही प्रश्न’ हा ग्रंथ १९४० मध्ये ‘श्री मातुश्री जमनाबाई स्मारक ग्रंथमालेत प्रकाशित करण्यात आले. तर भारतीय संगीतावरील एकूण १५ ग्रंथांपैकी विशेषतः मुलींसाठी तयार केलेले काही ग्रंथ ‘बालिका संगीत मालेत’ प्रसिद्ध करण्यात आले. ​१९४१ पर्यंत बडोद्याच्या पुरातत्व विभागाची तीन विभागीय संस्मरणे ‘Gaekwad’s Archaeological Series’ मध्ये प्रकाशित करण्यात आली. यामध्ये ‘Indian Pictorial Arts as Developed in Book Illustration’, ‘Ashokan Rock at Girnar’ आणि ‘Ruins of Dabhoi or Ancient Darbhavati’ यांचा समावेश आहे. १८८८ मध्ये ‘The Antiquities of Dabhoi’ तर १९०३ मध्ये ‘The Architectural Antiquities of North Gujarat’ हे बडोदा संस्थानातील प्रमुख स्मारकांचे महत्व सांगणारे दोन ग्रंथ सयाजीरावांच्या आश्रयाने प्रकाशित करण्यात आले. – सयाजीरावांनी इतर विषयांच्या बरोबरीने पाकशास्त्र ग्रंथमालेच्या माध्यमातून पाश्चिमात्य पाकशास्त्र (भाग ३) व ‘सुपशास्त्र’ (मद्रासी, मुसलमानी, इंग्रजी, तंजावरी इ. पद्धतीचा अंक ४) हे मोठे ग्रंथ व ‘भोजनदर्पण’ (१८९७), ‘भोजन दर्पण कला’ (१९०९), ‘पाकशिक्षण’ क्रमिक पुस्तके १ ते ३ (१९०८), ‘सयाजीपाकरत्नाकार’ (१९१७) ‘महाराष्ट्रीय स्वयंपाक’, ‘टेबल सर्विस’ अथवा ‘आंग्ल परिवेषण पद्धती’ (१९१६), पदार्थवार लागणाऱ्या जिन्नसांचे प्रमाण यावरील पुस्तक (भाग-३. १९२८), पदार्थवार आकाराचे पुस्तक (१९३०) इत्यादी अनेक पाकशास्त्रावरील ग्रंथ लिहून घेतले. – राष्ट्रीय खेळासंबंधीची तसेच जुन्या खेळांसह नव्या पाश्चात्य खेळांची माहिती जनतेला करून देण्यासाठी महाराजांनी क्रीडा ग्रंथमाला सुरू केली. या मालेतून नऊ-दहा पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली. कालेलकरांनी लिहिलेले व देवधरांनी दुरुस्त करून प्रसिद्ध केलेले ‘मराठी खेळाचे पुस्तक’ हे अत्यंत महत्त्वाचे पण आज दुर्मिळ असणारे पुस्तक छापण्यासाठी महाराजांनी ४,००० रुपये मदत दिली. जुम्मादादा व्यायाम मंदिराचे संस्थापक राजरत्न प्रो. माणिकराव यांनी ‘व्यायाम मंदिर’, ‘शरीरशास्त्र’, ‘मालिश’, ‘संघव्यायाम’ हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. १,८०० शस्त्रांची सविस्तर माहिती देणारे ‘प्रतापशस्त्रागार’ हे त्यांचा ग्रंथ आजही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. आबासाहेब मुजुमदार यांनी ‘व्यायाम’ नावाचे सचित्र मराठी मासिक सुरु केले. १९३६ ते १९४९ या कालावधीत आबासाहेब मुजुमदार यांनी ‘व्यायामकोश’ हा अद्वितीय कोश दहा खंडात प्रसिद्ध केला. हा मराठीतील आणि बहुधा कोणत्याही भारतीय भाषेतील पहिला कोश आहे. – नोकरांना शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याची सवय लागावी या हेतूने नियमविषयक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये ‘अहेर’, ‘बहुमान पोशाखाचा नियम’, ‘खाजगी खात्याच्या सामानसंबंधी नियम’, ‘अर्डली रूमसंबंधी नियम’, ‘स्वारी नियम खात्याच्या अर्थव्यवस्थेसंबंधी नियम’, ‘सिंहाचे व वाघाचे शिकारी संबंधीत नियम’, ‘छायाचित्रसंबंधी नियम’, ‘मरळ माशांच्या पैदाशीसंबंधित नियम’ इत्यादी पुस्तके तयार करून घेतली होती. ही सर्व पुस्तके सयाजीरावांच्या आश्रयाने प्रकाशित झाली होती. – ​​सयाजीरावांनी विविध विषयांवरील वाड्मयीन कोश निर्मितीला प्रोत्साहन दिले. बडोद्यातील ‘महाराष्ट्र वाङ्मयमंडळ’ या संस्थेतर्फे पदार्थशास्त्रातील विद्युत या विषयावरील शब्दकोश तयार करण्यात आला. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी प्रशासकीय सोयीसाठी राज्यव्यवहार कोश तयार करुन घेतला होता हे आपण जाणतोच. सयाजीराव महाराजांनी इंग्रजी, मराठी, गुजराती, संस्कृत, उर्दू, पारशी, हिंदी आणि बंगाली या ८ भाषांतील ‘श्रीसयाजीशासनशब्दकल्पतरू’ हा राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. श्रीधर व्यंकटेश केतकरकृत महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या २,००० रु. किमतीच्या प्रती सयाजीरावांनी विकत घेतल्या. तर गुजराती ज्ञानकोशासाठी ५,००० रु.ची मदत केली. गुजराती व मराठी ज्ञानकोशासाठी सयाजीरावांनी केलेली ही मदत आजच्या रुपयाच्या मूल्यात १ कोटी ९५ लाख रु. हून अधिक भरते. दत्तात्रय चिंतामण मुजूमदार यांच्या दहा खंडातील पाच हजार पानांच्या मराठीतील पहिल्या ज्ञानकोशास महाराजांनी ७,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य केले. मराठी शब्दकोशास ५००० रु. तर य. रा. दाते यांच्या ‘महाराष्ट्र शब्दकोशास’ १००० रुपयांची मदत केली. ​- महाराजांच्या २४ जगप्रवासाचे अहवाल, महाराजांचे ७५,००० हुजूरहुकुम, महाराजांची हजारो पत्रे आणि भाषणे, परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दौऱ्यांचे अहवाल, महाराजांनी नेमलेल्या शेकडो अभ्यास समित्यांचे अहवाल, संस्थानाचे प्रशासकीय अहवाल बडोदा सरकारमार्फत छापून प्रसिद्ध करण्यात आले. माहिती आणि ज्ञानाचे दस्ताऐवजीकरण करण्याचा हा काटेकोर प्रयत्न म्हणजे ‘Knowledge is Power’ या सुभाषिताची प्रात्यक्षिकच होते. ​- सयाजीरावांनी १८८७ पासूनच जगातील मौल्यवान ग्रंथांचे मराठी व गुजराती भाषांतर करण्याचे काम हाती घेतले होते. १८८७ मध्ये महाराज जेव्हा आपल्या पहिल्या परदेश प्रवासास युरोपला गेले तेव्हा तेथून त्यांनी कॅसलची ‘Dictionary of Cookery’ हा ग्रंथ मराठीत भाषांतर करण्याचे आदेश दिवाणांना दिले होते. मराठीत प्रकाशित झालेला अशा प्रकारचा हा पहिलाच ग्रंथ होता. १८८८ मध्ये भाषांतर शाखेची सुरुवात झाली. शास्त्रीय शिक्षणाची पुस्तके गुजराती भाषेत तयार करण्यासाठी महाराजांनी यावर्षी ५० हजार रु. मंजूर करून प्रो. गज्जर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. – १८९३ मध्ये संस्थानामार्फत विद्वान लेखक नोकरीत ठेऊन त्यांच्याकडून ग्रंथ लेखनाचे काम करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली. या योजनेअंतर्गतच मनिलाल द्विवेदींनी पाटण येथील प्रसिद्ध जैन भांडारातून २१ ग्रंथांचे संशोधनात्मक भाषांतर केले होते. १८९६ च्या वेदोक्तानंतर सयाजीरावांनी सर्व वेदोक्त विधींच्या संदर्भातील १६ संस्कारांच्या विधींचे रियासतकार सरदेसाईंकडून मराठी भाषांतर करून घेवून प्रकाशित केले. तर १९०५ च्या हिंदू विवाह कायद्यात १९२८ मध्ये केलेल्या सुधारणेनुसार लग्नविषयक सर्व वैदिक मंत्रांचे मराठी, गुजराती व हिंदी या भाषांमध्ये भाषांतर करून ते सरकारमार्फत प्रसिद्ध करण्यात आले. १८९७ ला सयाजीरावांनी विल्यम मॉरीसन यांच्या ‘क्राइम अँड इट्स कॉझिस’ या इंग्रजी ग्रंथाचे ‘गुन्हा आणि त्याचीं कारणें’ हे रामचंद्र हरी गोखले यांनी केलेले मराठी भाषांतर आपल्या ‘महाराष्ट्रग्रंथमाले’त प्रकाशित केले. ​- १९०८ मध्ये विद्याधिकारी खात्याच्या देखरेखीखाली महाराजांनी भाषांतर शाखेची नव्याने सुरुवात करण्यात आली. इंग्रजी ग्रंथांप्रमाणेच संस्कृत भाषेतील पुस्तकांचेही मराठी भाषांतर करण्यास सुरुवात झाली. यासाठी श्रावणमास दक्षिणेपैकी ५,५०० रु.ची तरतूद सयाजीरावांनी केली. नंतर याच निधीतून धर्मशास्त्रावरील पुस्तके मराठीत प्रसिद्ध करण्यासाठी वार्षिक १० हजार रु. खर्च करण्याचा हुकूम दिला. १९३१ मध्ये भाषांतर शाखा प्राच्यविद्या संस्थेशी संलग्न करण्यात आली. १९३२ अखेर भाषांतर शाखेवर १,५०,००० रु. खर्च करण्यात आले. “TRIBES & CASTES OF BOMBAY” आणि ‘The Folklore of Bombay’ या पुस्तकांचा गोविंद मंगेश कालेलकर यांनी केलेला अनुक्रमे ‘मुंबई इलाख्यातील जाती’ (१९२८) व ‘लौकिक दंतकथा’ (१९३४) हा मराठी अनुवाद श्री सयाजी साहित्यमालेतून प्रसिद्ध करण्यात आला. ​- विद्यार्थांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या महाराजांच्या धोरणानुसार विविध तज्ज्ञांनी आपापल्या विषयावर सोपे आणि परिपूर्ण ग्रंथ लिहिले. बाळकृष्ण नाईक यांनी ‘बाळ धर्म’(१९२०), प्रा. बा. प्र. मोडक यांनी ‘पदार्थविज्ञान’ (१९३०), प्रा. मा. क. भाटवडेकर यांनी ‘वनस्पतीशास्त्र’, प्रा. मो. के. दामले यांनी ‘सृष्टीशास्त्र’, मा. धो. खांडेकर यांनी ‘नीतीकाव्यामृत’, ‘नीतिशास्त्र प्रबोधन’ (१९३३) ही विविध पुस्तके मराठी भाषेत लिहिली. ​- सयाजीरावांनी इतरांकडून साहित्यनिर्मिती करून घेण्याबरोबरच स्वतःही विविध ग्रंथ लिहिले. १८९६ मध्ये सयाजीरावांनी लिहिलेला एडवर्ड गिब्बनच्या ‘रोमन साम्राज्याचा उत्कर्ष व ऱ्हास’ या ग्रंथावरील ‘From Caisar to Sultan’ हा टीकाग्रंथ इंग्लंडमधून प्रकाशित झाला. या ग्रंथाचे ‘कैसरकडून सुलतानाकडे’ हे मराठी भाषांतर राजाराम रामकृष्ण भागवत यांच्याकडून करून घेतले. १९०१ मध्ये लंडन येथील मॅकमिलन प्रकाशन संस्थेतून छापून घेऊन खाजगी वितरणासाठी महाराजांनी स्वतः प्रकाशित केलेला ‘Notes on Famine Tour’ हा रोजनिशी स्वरूपातील ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक ‘समाजशास्त्रीय दस्ताऐवज’ आहे. कारण भारतातीलच नव्हे तर जगातील दुष्काळाचा शोध घेवून राज्यकर्त्याने लिहिलेला हा एकमेव ग्रंथ आहे. १९११ साली ‘द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ’ हे भारतातील स्त्रियांच्या स्थितीबद्दलचे महाराणी चिमणाबाईंनी लिहिलेले आणि लंडनमधून प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे सयाजीरावांच्या स्त्रीशिक्षण धोरणाच्या फलश्रुतीचा ‘कळस’ होता. या पुस्तकाचे वेगळेपण म्हणजे आजअखेरचे अशा प्रकारचे हे जगातील एकमेव पुस्तक आहे. – तत्कालीन काळातील मराठीतील सर्वात मोठे प्रकाशक दामोदर सावळाराम यंदेंना सयाजीरावांचा राजाश्रय होता. १८९८ मध्ये प्रकाशनाच्या कामासाठी सयाजीरावांनी यंदेंना १,२०० रुपये देणगी दिली. आजच्या रूपयाच्या मूल्यात ही रक्कम ५० लाख रु.हून अधिक भरते. आधुनिक काळात एखाद्या प्रशासकाने समाजाला ज्ञानी करण्यासाठी महाराष्ट्रातच काय देशातही एवढी गुंतवणूक केल्याचे उदाहरण आढळत नाही. सयाजीरावांच्या या अनोख्या पुस्तक सेवेमुळेच त्यांना ७ साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद सन्मानपूर्वक देण्यात आले. या ७ संमेलनांमध्ये ४ मराठी व गुजराती, संस्कृत, हिंदी अशा प्रत्येकी १ भाषिक संमेलनांचा समावेश होता. १९३४ च्या बडोदा येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनात महाराजांनी साहित्य प्रकाशनाच्या कार्याकरिता २ लाख रुपयांचा स्वतंत्र निधी बाजूला काढून त्या रकमेच्या व्याजातून ग्रंथ प्रकाशनाचे कार्य अव्याहत चालू ठेवले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ७० कोटी रु. हून अधिक भरते. – ​मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, इंग्रजी आणि विशेष म्हणजे फ्रेंच भाषा अत्यंत उत्तम बोलणारा हा राजा आयुष्याच्या शेवटच्या पर्वापर्यंत नव्या-नव्या विषयांचे ज्ञान संपादित करत होता. राज्यकारभार हाती आल्यानंतर पहिल्या १० वर्षात संस्कृत भाषा शिकणारे आणि आयुष्याच्या शेवटच्या १० वर्षात खास फ्रेंच भाषेचा शिक्षक नेमून फ्रेंच भाषा अवगत करणारे सयाजीराव आयुष्याच्या संध्याकाळी वनस्पतीशास्त्र हा विषय अत्यंत पद्धतशीरपणे आत्मसात करत होते. जगातील सर्व भाषांना ज्ञानभाषा म्हणून सन्मानाने आणि समानतेने ते वागवत होते. ज्या संस्थानचे ते राजे होते त्या संस्थानातील प्रजेची गुजराती भाषा आणि मराठी या स्वतःच्या मातृभाषेला तितक्याच प्रेमाने त्यांनी ज्ञानभाषेची प्रतिष्ठा मिळवून दिली. मराठी भाषेसाठी त्यांनी जे योगदान दिले आहे तेवढे योगदान आधुनिक काळातील एकही प्रशासकाने दिलेले नाही असे भालचंद्र नेमाडे म्हणतात. मराठीतील बहुतेक सर्व विषयांवरील पहिली पुस्तके सयाजीरावांनी निर्माण केली. हा सर्व इतिहास विचारात घेता ते मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी ठरतात. त्यामुळेच महाराष्ट्रासाठी सर्वात प्रेरणादायी असणाऱ्या शिवरायांच्या शेजारी ते ‘नैसर्गिकपणे’ जावून बसतात. परंतु दुर्दैवाने शिवरायांच्या ‘विद्वान’ मावळ्यांना या एकमेवाद्वितीय राजाचा पुरेसा परिचयसुद्धा नसणे म्हणजे आपल्या पुरोगामित्वाच्या दारिद्र्याचा ‘शोध’ लागणे आहे. आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राने या राजाचे कृतीशील स्मरण केले तर ते बौद्धिक ‘आत्मसन्माना’ कडे नेणारे सकारात्मक पाऊल ठरेल.

You may also like

Leave a Comment