राष्ट्रीय

महाराजा सयाजीराव आणि परिचारिका सेवा क्षेत्र

by संपादक

महाराजा सयाजीराव आणि परिचारिका सेवा क्षेत्र
– (१२ मे परिचारिका दिनानिमित्त)
​- आरोग्य क्षेत्रात रुग्णांवरील उपचार आणि त्यांची सुश्रुषा करण्यात परिचारिकांची भूमिका महत्वपूर्ण असते. लंडनमधील फ्लॉरेन्स नाईटिंगल या परिचारिकेने संपूर्ण जगाला रुग्णसेवेची ओळख करून दिली. रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने तिने लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये मॉडर्न नर्सिंग स्कूलची स्थापना केली. प्रशिक्षण काळात परिचारिकांना शिष्यवृत्ती देण्याची पद्धत यु.के. मध्ये सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय फ्लॉरेन्स नाईटिंगल या परिचारिकेस जाते. फ्लॉरेन्सने १८५४ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना शोधून त्यांच्यावर उपचार करून अनेकांचे प्राण वाचवले. तिच्या या साहसी रुग्णसेवेमुळेच तिचा १२ मे हा तिचा जन्मदिवस संपूर्ण जगात ‘परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. या परिचारिका दिनाच्या निमित्ताने सयाजीरावांनी त्यांच्या बडोदा संस्थानात राबविलेल्या आरोग्यविषयक धोरणात परिचारिकांना दिलेले महत्व जाणून घेणे औचित्यपूर्ण ठरेल. ​‘महिलांचे आरोग्य हा पुरुषांच्या आरोग्याइतकाच देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे’ असे सयाजीराव महाराजांचे मत होते. अप्रशिक्षित सुईणींनी घरातच केलेल्या प्रसूतीमुळे आई व बाळाच्या जीवाला उद्भवणारा धोका व त्यातून निर्माण होणारे विविध आजारातून माता व बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्त्रियांना परिचारिका प्रशिक्षण द्यावे अशी सयाजीरावांची इच्छा होती. सर्वच ठिकाणी प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध असण्याची गरज व्यक्त करताना सयाजीराव महाराज म्हणतात, “राज्यात मोठमोठ्यांच शहरातून फक्त आधुनिक साधनांनी सज्ज अशा वैद्यकीय संस्था असाव्यात असे नाही, तर प्रत्येक तालुक्याच्या मुख्य ठिकाणी अनुकूलतेप्रमाणे लहान दवाखाने व प्रसूतिगृहे असावीत व प्रत्येक मोठ्या गावी औषधालये आणि शिकलेल्या सुईणी असाव्यात अशी माझी इच्छा आहे.” आजच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सयाजीरावांच्या या चिंतनाचे ‘खरे’ मोल आपल्याला कळते. ​प्रशिक्षित परिचारिकांचे महत्व अधोरेखित करताना पुढे सयाजीराव म्हणतात, “आपल्या बाळबाळंतिणींना आजच्या अज्ञानी सुइणी, विचारशून्य आप्त आणि चुकीच्या चालीरीती या तिघांच्या हवाली करून भयंकर संकटात लोटण्यापेक्षा जुन्या काळाच्या रानटी माणसाप्रमाणे तथा पशुपक्ष्यांप्रमाणे त्यांना प्रसूतीसमयी आपापली सोय आपणच लावून घेण्यास सांगितलेले पुष्कळ बरे…. प्रसूतीच्या वेळी जी परीक्षा म्हणा, मदत म्हणा करावयाची ती वैद्यकीय शुद्धता सांभाळूनच केली पाहिजे, नाहीतर रोगाचे जंतू शरीरात भिनण्याची या वेळी फार भीती असते. ही शुद्धता तुमच्या निर्बुद्ध, अशिक्षित सुईणीच्या अंगी कोठून असणार?” ११० वर्षापूर्वी सयाजीराव महाराजांनी मांडलेला हा वैज्ञानिक दृष्टीकोण आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे.
​- सयाजीरावांचा बडोद्यात परिचारिका प्रशिक्षण विद्यालय सुरू करण्याचा विचार होता. परंतु जागेच्या कमतरतेमुळे असे विद्यालय बांधणे शक्य नसल्याने सयाजीरावांचा हा विचार मागे पडला. यांसंदर्भात ३० जानेवारी १८८७ ला लेडीरे यांना लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, “तुम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण करण्याबाबत मला हे पत्र लिहावे लागत आहे. येथील जागेचा तुटवडा लक्षात घेता असा विचार झाला की, परिचारिका प्रशिक्षण विद्यालय येथे सुरू करणे हे अनावश्यक आहे. त्याऐवजी येथील गरजा पूर्ण करण्यासाठी मुंबईत प्रशिक्षित केलेल्या सहा तरुण मुली जर येथे आल्या तर येथे प्रशिक्षण विद्यालय सुरू करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आर्थिक तरतुदीच्या तुलनेत कमी खर्चात मोठे काम होऊ शकते. या महत्त्वपूर्ण कामासाठी काही मुलींना पाठवण्याचे आदेश मी आधीच दिलेले आहेत.” महाराजांनी पुढील वर्षी म्हणजे १८८८ मध्ये दोन महिला विद्यार्थिनींना परिचारिका व सुईनीचे शिक्षण घेण्यासाठी कॅमा हॉस्पिटलला पाठविले.
​- सयाजीरावांच्या सिल्व्हर ज्युबिलीच्या निमित्ताने १९०७ मध्ये न्यू स्टेट जनरल हॉस्पिटलची पायाभरणी करण्यात आली. जनतेच्या आरोग्यविषयक सोयीसुविधांच्या गरजा लक्षात घेऊन या हॉस्पिटलची रचना करण्यात आली होती. १९१७ मध्ये या हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले. २७ फेब्रुवारी १९१७ ला मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे परिचारिका प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आले होते. या प्रशिक्षण केंद्रामधून बाहेर पडलेल्या प्रशिक्षित परिचारिका स्त्रियांच्या आर्थिक सक्षमीकरणाची साक्ष देणार्‍या होत्या. या प्रशिक्षण केंद्रामुळे संपूर्ण संस्थानात प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध होऊन, स्त्रियांना तातडीने आरोग्यविषयक मदत मिळणे शक्य झाले.
​- बाळाच्या जन्मावेळी दाई हजर असण्याचे महत्व लोकांना पटवून देणे आणि दाईप्रती असणारा निष्काळजीपणा व केले जाणारे दुर्लक्ष यावर मात करण्यासाठी १६ ऑक्टोबर १९१९ रोजी बडोद्यात ‘दाई कायदा’ लागू करण्यात आला. या कायद्यानुसार परिचारिका प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही महिलेला सुइणीचे काम करण्याची परवानगी नाकारण्यात आली. परिचारिका प्रशिक्षण पूर्ण करून एखाद्या रुग्णालयात कामाचा अनुभव घेतल्यानंतरच त्या स्त्रीला परिचारिकेचा परवाना दिला जात होता. रितसर परिचारिकेचा परवाना घेतल्यानंतरच स्त्रिया परिचारिका म्हणून आपली सेवा बजावण्यास पात्र ठरत असत. या कायद्यामुळे अप्रशिक्षित सुईणीकडून स्वच्छतेची आणि आरोग्याची कोणतीही काळजी न घेता केल्या जाणाऱ्या बाळंतपणावर आळा बसला.
​-‘दाई अॅक्ट’ लागू केल्यानंतर बडोदा संस्थानात परिचारिका व्यवसायाचे प्रशिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली. हा कायदा करण्यामागे महाराजांचे दोन महत्त्वाचे हेतू होते. एक म्हणजे महिलांना प्रशिक्षित परिचारिकांच्या हस्ते आरोग्याशी संबंधित उपचार केले जावेत आणि दुसरा म्हणजे स्त्रियांनी परिचारिका प्रशिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावे. एखादी स्त्री विनापरवाना परिचारिकेचे कार्य करताना आढळल्यास तिला १०० रु. दंडाची तरतूद या कायद्यात होती. त्या वेळची ही १०० रुपये दंडाची रक्कम आजच्या रूपयाच्या मुल्यात २ लाख ६० हजार रुपयांहुन अधिक भरते. ही दंड स्वरुपातील रक्कम सयाजीरावांनी केलेल्या या कायद्याचे गांभीर्य लक्षात आणून देते.
​- सयाजीरावांनी बडोदा संस्थानात १९१९ ला दाई कायदा केला. परंतु या कायद्याची पूर्वतयारी ४ वर्षे अगोदर समाज प्रबोधनातून सयाजीरावांनी केली असल्याचे दिसते. २० जानेवारी १९१५ रोजी पाटण येथील प्रसूतिगृहाची कोनशिला बसविण्याच्या समारंभावेळी केलेल्या भाषणात सयाजीराव म्हणतात, “तिकडे (युरोपातील देशांत) सरकार, स्थानिक संस्था व बऱ्याचशा खासगी संस्थादेखील या कामात लक्ष घालून फक्त प्रसूतीच्या वेळी नव्हे तर प्रसूतीच्या आधीपासूनही गर्भिणी बायांची व गर्भस्थ मुलांची व्यवस्थितपणे काळजी घेतात. तिकडे प्रसूतीचे काम करावयाचे ते शिकलेली सुईण किंवा डॉक्टरच फक्त करतात आणि त्यांनीसुद्धा जर आपल्या कामात कुठे हयगय किंवा चूक केली तर ते शिक्षेला पात्र होतात किंबहुना मनुष्यहत्येचा आरोपही त्यांच्यावर ठेवता येतो. सुइणीचे शिक्षण तिकडे फार लांबलचक असते, नंतर परीक्षा देऊन त्यांना प्रशस्तिपत्र मिळवावे लागते आणि कामाच्या वेळी अनेक कडक नियम त्यांना पाळावे लागतात.” ​महिला आपल्या आरोग्यविषयक समस्या महिला डॉक्टरांशी जास्त मोकळेपणाने बोलू शकतील याची महाराजांना पूर्ण कल्पना होती. परंतु त्या काळात महिला डॉक्टरांची असणारी कमतरता सयाजीरावांच्या या कल्पनेतील सर्वात मोठा अडथळा ठरत होती. यावर उपाय म्हणून महाराजांनी दवाखान्यातून ‘लेडी सुपरीडेंट’ हे पद निर्माण केले. स्टेट जनरल हॉस्पिटलमधील ‘लेडी सुपरीडेंट’ या पदासाठी महिना ३०० रुपये विद्यावेतन व वार्षिक १५ रुपयांची वाढ निश्चित करण्यात आली होती. त्याचबरोबर परिचारिकांच्या नेमणुकादेखील करण्यात आल्या होत्या. या परिचारिकांना मासिक १६० रुपये वेतन दिले जात होते. तर दोन वर्षातून एकदा २० रुपये पगारवाढ केली जात असे.
​- केवळ आपल्याच संस्थानातील नव्हे तर कोणत्याही ठिकाणच्या परिचारिकांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक सयाजीरावांनी केले. ५ एप्रिल १९११ रोजी मुंबई येथील बॉम्बे सॅनिटरी असोसिएशन अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात सयाजीराव म्हणतात, “मुंबई म्यूनिसिपालिटीने नोकरीस ठेवलेल्या सुइणी जी कामगिरी करीत आहेत तिची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. ऐन बाळंतपणाच्या वेळेचे अर्ध्या-पाव तासाचे काम तेवढे या सुइणी करतात असे नाही, त्या आजाराची शुश्रूषा करतात, जन्ममृत्यूची खबर देतात, संसर्गजन्य रोगाने पिडलेल्या माणसांची माहिती पुरवितात आणि दया, दुःखनिवारण व ज्ञानदान ही पवित्र कार्ये वीरांगनांच्या उत्साहाने त्या करीत असतात.” ​ज्या काळात स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्याचाही अधिकार नव्हता त्यावेळी सयाजीरावांनी स्त्रियांना परिचारिका प्रशिक्षण देण्याचा आग्रह धरला. ही बाब जशी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करून स्वावलंबी बनवण्याचा मार्ग तयार करण्यास महत्वपूर्ण होती तशीच सयाजीरावांच्या स्त्री सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा दाखला देणारीही होती. महाराजांनी स्त्रियांच्या विकासासाठी केलेल्या वेगवेगळ्या सुधारणांना समाजातून प्रचंड विरोध झाला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत महाराजांनी आपले स्त्री सुधारणेचे कार्य सुरूच ठेवले. त्याचाच परिणाम म्हणून इतर संस्थानांच्या तुलनेत बडोदा संस्थानातील स्त्रिया शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणातसुद्धा पुढे असल्याचे दिसून येते. ​आज कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रुग्णांना वाचवण्यासाठी संपूर्ण भारतातील आरोग्य व्यवस्था करत असलेली ‘धावपळ’ आपण अनुभवत आहोत. आरोग्यविषयक सुविधांची कमतरता आणि योग्य नियोजनाचा अभाव या प्रमुख दोन कारणांमुळे असंख्य व्यक्तींचा जीव धोक्यात आला आहे. या आपत्तीतून ‘सहीसलामत’ सुटायचे असेल तर ११० वर्षापूर्वी सयाजीराव महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरुन ‘वाटचाल’ करण्याशिवाय भारताला तरणोपाय नाही.
– शिवानी घोंगडे, वारणानगर (८०१०४४७७४०)
– महाराजा सयाजीराव गायकवाड या फेसबुकवरून साभार www.facebook.com/groups/1534408386684683/permalink/3712960995496067/

You may also like

Leave a Comment