कोडोलीतील कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक – प्रशासनास उशिरा सुचलेले शहाणपण.

by Admin

कोडोलीतील कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक – प्रशासनास उशिरा सुचलेले शहाणपण
– कोडोली (प्रतिनिधि)कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोडोली येथे कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून स्थानिक प्रशासनाने कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
-सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या कोडोली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोडोलीसह वारणानगरचा समावेश होतो. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यातही कोडोली येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. परिसरातील महत्त्वाची बाजारपेठ, सहकाराचे जाळे,साखर कारखाना, दुध संघ,तसेच बॅंका पतसंस्था, आठवडी बाजार यामुळे आजुबाजुच्या नागरिकांचा दररोज कोडोलीशी संबंध येतो.
-सहकाराचा समृद्ध वारसा लाभलेल्या या परिसरात कोडोलीसह आजूबाजूला असलेल्या गावातील शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, कामगारांचा कायम राबता असतो.कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या सिमेवर असल्याने सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या पलीकडील वाळवा,शिराळा तसेच पन्हाळा तालुक्याबरोबर हातकणंगले तालुक्यातील जनतेचा नित्यसंबंध वारणा कोडोली परिसराशी येत असल्याने कोडोली गाव वेगाने विकसित झाले आहे. शंभर वर्षांपासून या परिसरात सहकाराचे जाळे घट्ट विणल्याने कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे वारणा कोडोली प्रमुख आर्थिक केंद्र बनले आहे. सहकार क्षेत्र विस्तारल्याने कोडोली हे ठिकाण प्रमुख आर्थिक केंद्र बनल्याने या परिसरात स्थानिकांबरोबर परिसरातील गावातील नागरिकांची दररोज ये-जा असते.
-गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे संपुर्ण जग हवालदिल झाले असताना या परिसरातही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले. कोरोना संकटकाळाचा सामना करण्यासाठी गेल्यावर्षी स्थानिक प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य केले होते. स्थानिक प्रशासनाच्या मदतीला कोरोना दक्षता समितीसह कोडोलीतील समाजसेवी संस्थानीही हातभार लावला होता.
-कोरोना काळात पोलीस प्रशासनानेही कडक भुमिका घेतल्याने मोठी लोकसंख्या असूनही कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी प्रशासनाला यश आले होते. कोरोनाच्या दुसर्या टप्प्यात यंदा मात्र कोरोना रुग्णांचे प्रमाण सतत वाढत असून कोरोनाशी मुकाबला करण्यात ग्रामपंचायतीसह स्थानिक प्रशासनाची मवाळ भुमिका कारणीभूत ठरत आहे. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने यंदा मात्र कोडोली परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे.
-गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र स्थानिक प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नेमकी कारवाई कोणी करायची याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.जिल्हा प्रशासनाने लावलेले निर्बंध नागरिकही जुमानत नसल्याने मुख्य रस्त्यावर सतत गर्दी असते.गेल्या वर्षी कोरोना दक्षता समितीचे कार्य प्रशंसणीय होते. कोरोना दक्षता समितीने घेतलेल्या कडक भुमिकेने कोरोनास थोपवण्यासाठी मदत झाली होती. यंदा मात्र कोडोलीतील कोरोना दक्षता समितीचे काम उदासीन असून कोरोना दक्षता समिती कागदावरच आहे की काय अशी अवस्था आहे. .
– नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करणे, शासनाकडून आलेल्या सुचना जनतेपर्यंत पोहोचवणे,कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. शासन नियमानुसार मुख्य बाजारपेठेतील दुकाने जरी बंद असली तरी आडबाजूला बाजारपेठे बाहेर दुकाने मात्र चालूच आहेत. रस्त्यावरील किरकोळ विक्रेते भाजीपाला विक्री बिनधास्त पणे चालू आहे.सलग तीन महिने बाजारपेठा बंद राहिल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत पण शासन नियमानुसार मिळालेल्या वेळे नंतरही अनेक दुकाने उघडी असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र सर्वत्र असून मुख्य रस्ते बाजारपेठ, भाजीपाला मार्केट, दुकाने, मुख्य चौक अशा गर्दीच्या ठिकाणीही नागरिक गर्दी करत आहेत. अनेक नागरिक विना मास्क वावरताना दिसत आहेत.कोरोना काळात रस्त्यावर फिरणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.
-कोडोली ही परिसरातील महत्त्वाची बाजारपेठ असल्याने येथे दिवसभर प्रचंड गर्दी असते त्यामुळे स्थानिक प्रशासनासह सर्व घटकांनी एकत्र येऊन कोरोना संकटाचा मुकाबला करण्याची गरज आहे सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनासह प्रसंगी खाजगी सुरक्षा रक्षकांची मदत घेण्याची गरज आहे. पोलिसांना जबाबदार स्थानिक घटकांनीही सहकार्य करण्याची गरज असून कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी समाजसेवी संस्थांची मदत घेण्याबरोबर पोलीस प्रशासनाने ही याबाबत कडक भूमिका घेतल्यास कोडोलीतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी होण्यास मदत होणार आहे.
-कोडोली ग्रामपंचायतीकडे सध्या 55 कर्मचारी कार्यरत असून ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्य विभागाशी समन्वय ठेवून काम केल्यास रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल त्यासाठी प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे. या परिसरात एकही मोठे शासकीय कोविड सेंटर नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागामार्फत सध्या घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी तपासणी केल्या जात आहेत मात्र नागरिकाकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद लाभत नाही तपासणीमध्ये सापडले रुग्ण घरीच क्वारंटाईन होत असून आपल्या उपचाराचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच घराबाहेर पडत पडत आहेत अशा पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
-ग्रामपंचायती मार्फत केल्या जाणाऱ्या उपायोजना अत्यंत तोकड्या असून त्यामुळे रुग्ण संख्या वाढतच आहे. चाचण्यांमध्ये पॉझिटिव आलेले रुग्ण तसेच खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण यांची नोंद घेऊन त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना करणे, मास्कचा वापर केल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी बंदी , गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे, लक्षणे दिसतात तातडीने तपासणी करून घेणे यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक प्रशासन कमी पडत असून कागदावर असणाऱ्या कोरोना दक्षता समितीला सक्रिय करण्याची गरज आहे.
-एखाद्या प्रभागात, गल्लीत कोरोना बाधितांची संख्या अधिक सापडली तर व तो प्रभाग प्रतिबंधित करण्याची गरज असताना अनेक वेळा ग्रामपंचायतीकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते मात्र स्थानिक नेते, पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी या परिसरात भेट देण्यासाठी आले असता अनेक ठिकाणी रातोरात परिसर प्रतिबंधित असल्याचे बोर्ड लावले जातात तसेच तो परिसर बॅरिकेट्स लावून बंद केला जातो यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होतो त्यापेक्षा बाधित रुग्ण सापडल्यानंतर तो परिसर लगेच प्रतिबंधित केला पाहिजे,त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी केली पाहिजे तसेच त्या परिसरात औषध फवारणी करून तो परिसर निर्जंतुकीकरण केला पाहिजे याबाबत ग्रामपंचायत प्रशासन मात्र ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशा पद्धतीने उपाययोजना करताना दिसत आहे आगामी काळात प्रशासनातील सर्व घटक, स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा यांनी एकत्र येऊन काम केले तर कोडोलीतील रुग्णसंख्या आटोक्यात येईल अन्यथा रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यास नागरिकांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशी स्थिती आहे तसेच नागरिकांनीही जबाबदारीने कोरोना विषयक निर्बंधांचे पालन केले नाही तर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे हे नक्की.

You may also like

Leave a Comment