महाराष्ट्र

दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला ३५०वा शिवराज्याभिषेकाचा सोहळा ‘लोकोत्सव’ म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीची वज्रमूठ बांधावी – युवराज संभाजीराजे छत्रपती

by संपादक

पुणे : दुर्गराज रायगडावर ५ व ६ जूनला ३५० शिवराज्याभिषेकाचा सोहळा लोकोत्सव’ म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीची वज्रमूठ बांधावी, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी येथे केले. पुणे येथील ऑल इंडिया श्री छत्रपती शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये आयोजित शिवराज्याभिषेकाच्या पूर्व नियोजनाच्या राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती प्रमुख उपस्थित होते. 


         संभाजीराजे म्हणाले, ‘‘शिवराज्याभिषेकास यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्त पाळून गडावर येणे गरजेचे आहे. समितीतर्फे गडावर येणाऱ्या शिवभक्तांना आवश्‍यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. गडावर येताना प्लास्टिक कचरा होणार नाही, याची दक्षता मात्र शिवभक्तांनी घ्यावी. पाच व सहा जूनला होणाऱ्या विविध उपक्रमांत उत्साहाने सहभाग घ्यावा.’’ते म्हणाले,  ‘‘शिवराज्याभिषेक लोकोत्सव झाला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवभक्तांचा गडावर ओघ वाढत आहे. देशाच्या अन्य राज्यांतून शिवभक्त गडावर दाखल होत आहेत. पारंपरिक कला, परंपरा सादर करत कलाकार सोहळ्याचा आनंद द्विगुणित करत आहेत.’’संयोगिताराजे म्हणाल्या, ‘‘समितीतर्फे विविध समित्या स्थापन केल्या असून, त्यातील कार्यकर्त्यांनी शिवभक्तांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी. होळीच्या माळावर गर्दी नियंत्रण ठेवताना समितीच्या सदस्यांचा कस लागतो. त्यामुळे शिवभक्तांनी स्वयंसेवक म्हणून काम करताना समितीच्या सदस्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. शिवभक्तांकडून आलेल्या सुचनांचा आदर ठेवून, त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल.’’ समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले. समितीचे सदस्य अतुल चव्हाण यांनी स्वागत केले व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी आभार मानले.
 
         या नियोजन बैठकीस अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, सचिव अमर पाटील, विनायक फाळके, संदीप खांडेकर, प्रवीण पवार, प्रवीण हुबाळे, विकास देवळे, उदय घोरपडे, स्वराज्य प्रवक्ते धनंजय जाधव, अंकुश कदम, आप्पासाहेब कुडेकर, रघुनाथ चित्रे पाटील, रोहित पडवळ -धाराशिव, अतुल चव्हाण, डॉ.गजानन देशमुख-संभाजीनगर, सोनाली देशमुख-अमरावती, विठ्ठल बराते-भूम, चैत्राली कारेकर, सत्यजित भोसले-मुंबई, रोहित जाधव-सातारा, आत्माराम शिंदे-संभाजीनगर, निखिल काची, यशवंत तोडमल-नगर, मंगेश कदम-नांदेड, महादेव तळेकर-पंढरपूर, सत्यम सूर्यवंशी-करमाळा, महेश शिंदे-तुळजापूर, इतिहास संशोधक सुवर्णाताई निंबाळकर, बापू कुटवळ, वर्षा चासकर, समर्थ काळे-बार्शी, ओंकार व्यवहारे नगर आदी समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते

गतवर्षी होळीच्या माळावर सहा जूनला सकाळी आठनंतर युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर झाली. तेथे शिवभक्तांची गर्दी होऊन, त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य झाले. त्यामुळे येथे सहा जनूला सकाळी युद्धकला अथवा लोककलांचे कोणत्याही परिस्थितीत सादरीकरण होणार नाही, याची दक्षता शिवभक्तांनी घ्यावी, असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे यांनी केले.

You may also like

Leave a Comment