वारणानगर (प्रतिनिधी)आहार, आरोग्य ,निसर्ग, पर्यावरण, शिक्षण, राजकारण यासारख्या सगळ्याचं बाबतीत सद्यस्थितीत बिघडत चाललेले विस्थापन एकदिवस वर्तमान संपवून टाकणार असल्याची परखड प्रतिक्रिया साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांनी व्यक्त केली .
येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वर्षा व्याख्यानमालेत ” विस्थापनाचे वर्तमान….” या विषयावर बोलताना पुढे म्हणाले की सक्तीच्या आणि इच्छेच्या विस्थापनामुळे कागदावरच्या माहीतीतल्या शिक्षणाला आपण फार महत्व देत आलोय पण आजही निरक्षर आडाणी लोकांकडे असलेले अफाट ज्ञान ,आणि शहाणपण मात्र अडगळीत टाकले गेल्याने शिक्षणाच्या विस्थापनाची बाब भयावह आणि गंभीर बनत चालली आहे. देशाचे वाटोळे करण्यासाठी शिक्षण असेल तर शिक्षणाचे विस्थापन वेळीच सुधारले पाहिजे. सध्या लोकशाहीत राजेशाही येवू पहात आहे. वाढत्या स्पर्धेत व्यक्तीवादाचे बळी ठरत आहेत. आपण कष्टाला थोर मानायचे विसरून जात श्रमसंस्कार संपवत आहोत, यासाठी शिक्षण, शेती, सहकार, राजकारण, समाजकारण, यासारख्या गोष्टीतले बिघडत चाललेले विस्थापन आज सुधारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन साहित्यिक कृष्णात खोत यांनी केले. याप्रसंगी वारणा दुध संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव यांच्या हस्ते साहित्यिक कृष्णात खोत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर,शाहीर शामराव खडके, कथाकथनकार आप्पासाहेब खोत,अनिल शिनगारे, बबलू वडर,बबन केकरे आदींसह शारदा वाचन मंदिराचे सदस्य शशिकांत कुलकर्णी ,जे एस पाटील, जगन्नाथ चरापले,अनंत पाटील ,विलास दरडे, आदींसह वारणा समुहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी मान्यवर विद्यार्थी, रसिक श्रोते उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय अनिल मोरे यांनी करून दिला. आभार ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी मानले.