वारणानगर (प्रतिनिधी)बदलत्या समाजरचनेत पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणातून उदयास आलेल्या ” लिव्ह इन रिलेशनशिप ” या विकृतीमुळे विवाह संस्कार धोक्यात येत असल्याचे मत ताज मुल्लाणी यांनी व्यक्त केले.
येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वर्षा व्याख्यानमालेत ” बदलता समाज आणि आपले संस्कार….” या विषयावर बोलताना ताज मुल्लाणी पुढे म्हणाले की लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेला कायद्याची मान्यता मिळाल्याने विवाह संस्कार ही संस्कृती लोप पावण्याचा मार्गावर असून वाईट चालीरीती वाढत असल्याची खंत व्यक्त केली. आजकाल पैशाने शिक्षण विकत घेता येते पण संस्कार रूजवावेच लागतात. पालक म्हणून मुलांना घडविण्यात कमी पडत आहोत.उद्याचा भारत महासत्ता व्हायचा असेल तर नवी पिढी सुशिक्षित संस्कारक्षम घडायला पाहिजे. सध्या देशात भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार, वशिलेबाजी, व्यसनाधीनता यासारख्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. सद्यस्थितीतील बदलत्या काळानुसार सकारात्मक माणूसकीचा संस्कार जपायला पाहिजे.मळलेल्या वाटेपेक्षा स्वतः ची वेगळी वाट निर्माण करा असा संदेश आजच्या तरूणाईला देत समाज बदलत चालला असला तरी जुन्या रूढी, चालीरीती ,परंपरा ,संस्कृती जपण्याची गरज असल्याचे ताज मुल्लाणी यांनी व्यक्त केले.याप्रसंगी बहिरेवाडीचे युवानेते अमेय जाधव यांच्या हस्ते ताज मुल्लाणी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमोद कोरे, सुरेश साखरपे, के जी जाधव आदींसह आदींसह वारणा समुहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी मान्यवर विद्यार्थी, रसिक श्रोते उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय प्रा नामदेव चोपडे यांनी करून दिला. आभार ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी मानले.