कोल्हापूर

शेतमजूर ते कोडोलीचे प्रसिद्ध कर सल्लागार- शामराव हुजरे- लोखंडे

by संपादक

        कोडोली येथील गणपती गल्लीत तीन खोल्यांचे  घर, खापऱ्यांनी शेकारलेले छप्पर, या इवल्याशा घरात आई-वडील, चार भाऊ, बहीण, भावजयी, पुतणे असे सोळा माणसांचे कुटुंब. स्वमालकीची शेतीवाडी नाही. अशी कौटुंबिक परिस्थिती असणाऱ्या ध्येयवेढ्या तरुणांने शेतमजुरी व छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत अत्यंत कठीण परिस्थितीत एम. कॉम. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून 1991 सली कोडोलीत भाड्याच्या खोलीत कर सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यांची कामावरील निष्ठा व लोकांचा विश्वास यामुळे कोडोली परिसरात ज्यांची प्रसिद्ध कर सल्लागार अशी ओळख निर्माण झाली ते म्हणजे शामराव रामचंद्र हुजरे- लोखंडे. त्यांच्या अध्यायावत व प्रशस्त ऑफिसची स्वप्नपूर्ती आज रविवार दि. १८/ ८/ २४ रोजी पूर्ण होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध घटना विषयी घेतलेला थोडक्यात आढावा…..

👉 तुमचे बालपण व कुमारावस्थेचा काळ याविषयी काय सांगाल?

    – बालपण व कुमारावस्थेचा काळ अत्यंत गरिबीत व्यतीत झाला. घरात वडील, आई आकुबाई, चार भावात मी धाकटा, जन्माने दुसऱ्या क्रमांकावर असलेली एक बहीण असा आमचा कुटुंबकबीला होता. आमच्या मालकीचे फक्त तीन खोल्यांचे साधे घर होते.  गावात स्वतःच्या मालकीची वितभर देखील जमीन नाही. त्यामुळे घरचे रहाटगाडगे ओढण्यासाठी आई-वडील व भावंडे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायचो. 

👉गरीबीतून शाळा कशी शिकलात?

     – जसं मला कळायला लागले तेव्हापासून दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करू लागलो. शाळा शिकण्यासाठी आमची परिस्थिती नव्हती तरीही वडिलांनी कोडोलीच्या पूर्वाश्रमीच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर (आत्ताचे एक कुमार विद्यामंदिर) शाळेत नाव दाखल केले होते.  मोलमजुरी करत या शाळेतून कोडोली हायस्कूल मध्ये दाखल झालो. दहावीपर्यंत दुसऱ्याच्या शेतात भांगलन, कोळपण, पेरणी, काढणी वगैरे कामे करत शिक्षण घेतले. त्यावेळी लहानग्यांना दिवसाला चार रुपये तर मोठ्यांना सहा रुपये पगार मिळायचा आलेल्या पगार आई-वडिलांच्या हातात द्यायचो.

👉शालेय जीवनात मौजमजा करत होतात काय? 

    – कसली मजा करताय? अंगात सणासुदीला ड्रेस मिळायचा. त्या काळात अंगात सुंदर कपडे पण घालायला मिळत नसत. मांजरपाट कापडाची पांढरी विजार त्याच कापडाचा सदरा, कधी गुडघ्यापर्यंत ढगळी अर्धी चड्डी असा पेरावा असायचा. पायात चप्पल नसायचे असल्या अवतारात कशाची मजा आलीय!

👉दहावी नंतर पुढे काय? 

     – दहावी नंतर पुढे तीन वर्षे शिक्षणास बंद पडले. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या मलेरिया विभागात नोकरी पत्करली.  वारणा साखर कारखान्याकडे ऊस तोडणी मजुरांचा मलेरिया सर्वे करून त्यांना औषधोपचार करण्याचे काम केले. गळीत हंगामात सहा महिने हे काम करायचे व नंतरच्या सहा महिन्यात डीडीटी पावडर फवारण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात फिरत असत असे. त्यावेळी दरमहा ४५० रुपये पगार मिळत असे. १९७५ ते १९८५ पर्यंत हे काम केले

👉महाविद्यालयीन शिक्षणाकडे कसे वळलात? 

    – सन १९८० ला वाणानगरमधील वारणा महाविद्यालयातील वाणिज्य विद्या शाखेत अकरावी वर्गात प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज करायचे व दिवसभर मलेरिया विभागात काम करायचे. सन १९८५ ला बी. कॉम. होईपर्यंत मलेरिया विभागात काम केले.

👉नोकरी व अभ्यास हे वेळापत्रक कसे काय साधले? 

     – सकाळी कॉलेज, दिवसभर नोकरी, रात्री दहा ते पहाटे चार पर्यंत अभ्यास अशा प्रकारे वेळेचे नियोजन केले होते. शरीर व मनाला विश्रांती मुळी नव्हतीच!

👉पदवीधर झाल्यावर पुढे काय केले? 

     – सन १९८५ ला बी. कॉम. झाल्यावर कोरे कुटुंबियांच्या वारणा  इलेक्ट्रॉनिक्स येथे अकौंटंट पदावर नोकरीस लागलो. नोकरी करत एम. कॉम. हे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

👉 पदव्युत्तर शिक्षण कोठे घेतले? 

     – कोल्हापूरच्या रत्नाप्पा कुंभार नाईट कॉलेजमध्ये मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सन १९८८ चा हा काळ रात्री कॉलेज करून रात्रीचे साडेआठ वाजता कोडोलीला  मिळेल त्या वाहनाने घरी येत असे. दिवसभर वारणा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरी करायचो. त्या काळात मला महिन्याला पाचशे रुपये पगार मिळायचा. सन १९९१ पर्यंत मी ही नोकरी केली.

👉लग्न केव्हा केले? 

     – सन १९८९ साली कोतोली (माळवाडी) ता. पन्हाळा येथील सुनंदा या बारावीच्या कला वर्गात शिकणाऱ्या मुलीशी माझे लग्न झाले. दुर्दैवाने माझ्या वडिलांना माझे लग्न पाहता आले नाही. माझ्या लग्नाच्या आधी १९८८ साली त्यांचे निधन झाले होते.

👉 कर सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय केव्हा सुरू केला? 

    – २६ जानेवारी १९९१ ला कोडोलीत भाड्याच्या जागेत कर सल्लागार व्यवसाय सुरू केला. त्यावेळी आम्ही भावंडे विभक्त झालो होतो. कार्यालयाच्या गळ्यासाठी डिपॉझिट द्यायला पैसे नव्हते म्हणून पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज काढले व डिपॉझिट दिले.

👉संकटाच्या काळात ओळखीची माणसे पाठ फिरवतात याबद्दल तुमचा अनुभव काय? 

     – तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु जगात सर्वाच माणसे वाईट नसतात. त्या काळात श्री अनंत विरुपक्ष उबारे, कै. अण्णा चरणकर, प्रविण पाटील, नामदेव पाटील- त्रिपणे, इत्यादी व्यापाऱ्यांनी मला खूप मोठे सहकार्य केले. त्यांचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही.

👉 स्वमालकीच्या कार्यालयात आल्यानंतर तुमच्या समस्या दूर झाल्यात का? 

 

 

     – 1995 ला मी स्वतःच्या घरात माझे ऑफिस सुरू केले. त्यामुळे अनेक समस्या सुटल्या. तसेच भाडे वाचले यामुळे उत्पन्न वाढायला लागले. त्यावेळी दरमहा पंधरा हजार रुपये नफा मिळायला लागला. सन 2000 मध्ये कोडोलीच्या पोखले फाट्यावर शामूनानानगर येथे प्लॉट घेऊन सन 2003 साली तिथे बंगला बांधला व या बंगल्यातच ऑफिस सुरू केले.

👉आजची परिस्थिती व कुटुंबाविषयी काय सांगाल?

– अनेक संकटाशी तोंड देऊन कष्टाने व प्रामाणिकपणे हा व्यवसाय केल्याने आज माझा व माझ्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला असून कौटुंबिक जीवनही अतिशय व्यवस्थित सुरू आहे. त्याचबरोबर मी पाहिलेली दोन्ही स्वप्ने पूर्ण होत आहेत याचा मला खूप आनंद वाटत आहे. यातील पहिले स्वप्न म्हणजे माझ्या व्यवसायाकरिता प्रशस्त असे ऑफिस असावे हे होते. ते रविवार दि.१८/८/२४ रोजी पूर्णत्वास जात असून हुजरे कॉम्प्लेक्स, शामुनानानगर, पोखले रोड, कोडोली या ठिकाणी तीन मजली इमारतीत माझे प्रशस्त असे ऑफिस सुरू होत आहे . माझे दुसरे स्वप्न होते की माझ्या दोन मुलांपैकी एकाने चार्टड अकौंटंट( CA) व्हावे हे स्वप्नही माझा दोन नंबरचा चिरंजीव धीरज याने पूर्ण केले असून त्याने 10 जानेवारी 2023 रोजी चार्टड अकौंटंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. माझा मोठा मुलगा सुशांत एम. कॉम. असून तो व धीरज हे दोघेही मला आता व्यवसायात मदत करत आहेत. सुशांत याचे २०/०१/२० साली लग्न झाले असून त्याची पत्नी  सौ. प्राजक्ता ही सुद्धा एम. कॉम. आहे व ती सुद्धा मला व्यवसाय हातभार लावत आहे. ०६ जानेवारी 2023 मध्ये तनुष या नातवाचे आगमन (जन्म) झाले व १० जानेवारीला चिरंजीव धीरज चार्टड  अकौंटंट झाला हे दोन्ही दिवस माझ्या आयुष्यातील आनंदाचे दिवस आहेत. दरम्यान माझे दुसरे चिरंजीव चार्टड  अकौंटंट धीरज यांचा विवाह ठरला असून त्याची नववधू चि. सौ. का. सायली डॉक्टर आहे. तिच्यासाठी माझ्या नवीन इमारतीमध्ये दवाखाना सुरू करण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवली आहे. लवकरच तिच्या दवाखान्याची आम्ही सुरुवात करणार आहोत .या सर्व यशात मला माझी पत्नी सौ. सुनंदा हिची मोलाची साथ मिळाली. एकंदरीतच आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी हा टप्पा गाठल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

👉व्यवसाय व्यतिरिक्त आपणास कोणता छंद आहे ?

– लहानपणापासूनच मला सामाजिक कार्याची आवड आहे. कोडोलीतील गणेश तरुण मंडळांचा मी सक्रिय कार्यकर्ता होतो. सहकाऱ्यांच्या योगदानातून कोडोलीत आम्ही गणेश मंदिर उभारले आहे. याबरोबरच जेष्ठ नागरिकांना मी मोफत कर सल्ला देतो. कर व गुंतवणूक  विषयी मोफत व्याख्याने देतो. आमच्या कॉलनीतील आर्थिक व इतर व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी नागरिकांनी विश्वासाने माझ्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडतो आहे.

You may also like

Leave a Comment