कोडोली (प्रतिनिधी) येथील मिस मेरी गोथे दुर्कस महिला मंडळाचा शतक महोत्सवी समारंभ ३१ ऑगस्ट रोजी कोडोली चर्चेच्या खुल्या पटांगणावर होणार आहे. यावेळी स्मरणिका प्रकाशन, महिला मेळावा, विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्षा सुनंदा चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शंभर वर्षांपूर्वी परदेशातून मिशनरी म्हणून कोडोली येथे आलेल्या मिस मेरी गोथे यांनी 30-35 महिलांना एकत्र करून महिला मंडळाची स्थापन केली. या महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शोषित, पीडित ,दलित तसेच निराधार महिलांना आधार देण्याचे काम केले. याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले. त्यांचे ११ जानेवारी १९३० रोजी निधन झाले. त्यांचे स्मरण व महिला मंडळांचा शतक महोत्सव निमित्त गेले वर्षभर भजन स्पर्धा, समूह गायन, प्रश्नमंजुषा, निबंध, परिसंवाद, खेळ, रांगोळ्या अशा विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. अशी माहिती सुनंदा चोपडे यांनी यावेळी दिली.
या शताब्दी महोत्सवास कोडोली परिसरातील महिला मान्यवरासह सांगली, कोल्हापूर ,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, बेळगाव इत्यादी जिल्ह्यातून महिला प्रतिनिधी, त्या त्या मंडळांचे पदाधिकारी ,धर्मगुरू, केसीसी शाळांचे मुख्याध्यापक, केसीसी कार्यकारणी, यु.सी.एन.आय. कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख संदेशकार म्हणून वर्षा कनेर यांची उपस्थिती लाभणार आहे. पत्रकार परिषदेस महिला मंडळाच्या सेक्रेटरी सुमन आढाव ,खजिनदार एस्तेर समुद्रे, कार्यकारी अध्यक्षा सुरेखा गायकवाड यांच्यासह महिला पदाधिकारी, चर्च सेक्रेटरी डी. के. चोपडे, खजिनदार डॅनियल गायकवाड, एस. आर. रणभिसे आदी उपस्थित होते