कोडोली (प्रतिनिधी) भारतीय खेळ प्राधिकरण खेलो इंडिया यांच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या मैदानी अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता सन २४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी १३ ते १६ वयोगटातील 30 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.याकरिता सोमवार दि.१५ जुलै रोजी कोडोली हायस्कूल येथील पटांगणावर सकाळी आठ पासून निवड चाचणी सुरू होणार आहे. अशी माहिती कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या निवड चाचणीसाठी खेळाडूंनी आपली नावे नोंद करताना आधार कार्ड ,रेशन कार्ड, बोनाफाईड दाखला ,दोन फोटो व मैदानी खेळाची सण २३-२४ चे जिल्हा, विभाग ,राज्य ,राष्ट्रीय मैदानी स्पर्धेच्या मूळ प्रमाणपत्राच्या प्रती व प्रत्येकी दोन झेरॉक्स सोबत आणाव्यात. याबरोबरच रक्तगट तपासून त्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे असेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस प्रशालेचे मुख्याध्यापक एम. बी. बोरगे, प्रशासकीय अधिकारी संदीप शिंदे, पर्यवेक्षक चंद्रकांत शिंदे, प्रशिक्षक प्रतिक कदम उपस्थित होते.